२.१.२३

मारून दोन गोळ्या मरणार काय गांधी ?
मारून दोन गोळ्या मरणार काय गांधी ?

पुरुनी पिढ्यापिढ्यांना उरणार हाय गांधी !


लावा उगाळुनी रे दुखण्यावरी महात्मा

हा रामबाण आहे, देशी उपाय गांधी


खोटेच युद्ध लढते घोड्यावरून नकली

ह्या मतलबी नटीला कळणार काय गांधी ?


दारू पिऊन रात्री दोघीस बाप मारे

लेकीस दूध पाजी होऊन माय गांधी


दररोज नासणारे हे दूध राजधर्मी 

सत्यावरी तरीही धरणार साय गांधी


शोधून नोकरीला कंटाळला कधीचा

आता भल्याभल्यांना पाजेन चाय गांधी !


('कविता-रती ' दिवाळी २०२२)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: