रोज ताजे नव्याने मरू लागले लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
रोज ताजे नव्याने मरू लागले लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

रोज ताजे नव्याने मरू लागले

रोज ताजे नव्याने मरू लागले;
लोक राजा असे का करू लागले?

भांडती चेहरे हे स्वतःशी अता;
कॉलरी आरशांच्या धरू लागले.

सापडेना घराची कशी वाटुली;
पाय चौकातले बावरू लागले.

लाज देशोधडीला कधी लागली?
नेसुचे सोडुनी पांघरू लागले.

कुंपणांनी दिला वावरांना दगा;
सांड मोकाट लाखो चरू लागले.

काय ताटात ह्या वाढले रे असे?
जेवणारे पहा घाबरू लागले.
-----------------------------------
('आदिम' दिवाळी 1982)
■ लेखन : १२  जुलै १९८२