यादीत किराण्याच्या तारूण्य हरवले माझे लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
यादीत किराण्याच्या तारूण्य हरवले माझे लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

यादीत किराण्याच्या तारूण्य हरवले माझे


यादीत किराण्याच्या तारूण्य हरवले माझे;
आणून हसू उसने मी ओठ सजवले माझे.

दो-यास दोष नाही, नसे अपराध कपड्याचा;
अर्जांच्या गर्दीने ह्या खिसे उसवले माझे.

दुरडी रिती बिचारी झोपडीत जागत होती;
सांगून कहाणीला मी पोर निजवले माझे.

भेट तुझी घेताना माझेच काय मी सांगू?
तुझ्या खुशालीमागे मी दु:ख लपवले माझे.

प्रेमसुखाची वर्षा बरसली तुझ्या मेघांनी;
विजेसारखे तळपत आयुष्य उजळले माझे.

जगता जगता अपुल्या जगण्याचा उत्सव व्हावा;
म्हणून जळता जळता मी हृदय फुलवले माझे.