६.५.१६

काय काय तू गोळा केले आयुष्या रे सटरफटर

काय काय तू गोळा केले आयुष्या रे सटरफटर ;
गझला,गाणी, कविता,पत्रे,ग्रंथ बिचारे सटरफटर .

पटलेल्यांना जीव लाव तू, हुकलेल्यांना टाटा कर ;
सवाल नाजुक सोडव प्रेमा, अशा प्रकारे सटरफटर.

भिंतीपाशी रडती भिंती सांगत गोष्टी दुःखाच्या  ;
घराघराची किरकिरणारी खिडक्या - दारे सटरफटर.

वीज बांधतो मिठीत कोणी भाग्यवान तो एखादा ;
उल्का होउन कोसळणारे कितीक तारे सटरफटर.

थेंबाथेंबासाठी वणवण मरता मरता बायांनो,
'मुली वाचवा मुलीस शिकवा ' ऐका नारे सटरफटर.

सुखदुःखाला साक्षी राहे तोच विठोबा खरा तुझा ;
भोजनभाऊ खाण्यापुरते बाकी सारे सटरफटर.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: