३.५.०९

बेरंग बाग झाली; कोठे सुगंध गेले


बेरंग बाग झाली; कोठे सुगंध गेले?
येथे ऋतूऋतूंनी चाळे अनेक केले.

पोलाद शब्द सगळे हे ओकतात भूसा;
की प्रस्थ वाळवीचे भलतेच माजलेले?

पंचांग सांगते की होईल खूप वर्षा;
नवजात शेत माझे संपूर्ण वाळलेले.

डोळ्यात वीज माझ्या, ओठावरी निखारे;
माझ्या उरात ताजे हंगाम पेटलेले.

आहे तसाच आणा काळा चहा गडे हो;
येथील दूध सारे बोके पिऊन गेले.

वाफ्यातले जुने हे बदलू जरा बियाणे;
तेव्हा कुठे इथेही उगवेल पेरलेले.



३ टिप्पण्या:

प्रशांत म्हणाले...

मस्त! विषय तसा कवितेच्या दृष्टीने निरस वाटतो, पण त्यात वास्तवाचं वर्णन इतक्या आकर्षकपणे होऊ शकतं, हे या कवितेतून जाणवलं.
ही कविता प्रकाशित केल्याबद्दल धन्यवाद.

dr.shrikrishna raut म्हणाले...

मन:पूर्वक आभार.

Mahesh Savale म्हणाले...

वा..... आपल्या लिखानामूळॆ जन्मभर उब व स्फूर्ती मिळत राहील......यात काही शंकाच नाही....आपला आशिर्वाद असावा .....