१.६.०९

उल्लेख टाळलेल्या आहेत खूप गोष्टी


उल्लेख टाळलेल्या आहेत खूप गोष्टी;
शास्त्रोक्त गाडलेल्या आहेत खूप गोष्टी.

द्यावा कसा पुरावा नाही ठसा कुठेही;
साद्यंत चाळलेल्या आहेत खूप गोष्टी.

डोळ्यात धूर जाता केकाटली स्मशाने-
संपूर्ण जाळलेल्या आहेत खूप गोष्टी.

अर्ध्यात संपलेल्या समजून घ्या कहाण्या;
अर्ध्यात फाडलेल्या आहेत खूप गोष्टी.

नादार लक्तरांची भांबावते उधारी;
मुद्दाम नाडलेल्या आहेत खूप गोष्टी.

निर्माल्य जीवनाचे शोधू कुठे, कसा मी?
पाण्यात सोडलेल्या आहेत खूप गोष्टी!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: