उत्सव
यादीत किराण्याच्या तारूण्य हरवले माझे;
आणून हसू उसने मी ओठ सजवले माझे.
दो-यास दोष नाही, नसे अपराध कपड्याचा;
अर्जांच्या गर्दीने ह्या खिसे उसवले माझे.
दुरडी रिती बिचारी झोपडीत जागत होती;
सांगून कहाणीला मी पोर निजवले माझे.
भेट तुझी घेताना माझेच काय मी सांगू?
तुझ्या खुशालीमागे मी दु:ख लपवले माझे.
प्रेमसुखाची वर्षा बरसली तुझ्या मेघांनी;
विजेसारखे तळपत आयुष्य उजळले माझे.
जगता जगता अपुल्या जगण्याचा उत्सव व्हावा;
म्हणून जळता जळता मी हृदय फुलवले माझे.

