* बंद कशाने पडली शाळा

 बंद कशाने पडली शाळा ; प्रश्न विचारा

दप्तर-पुस्तक चुलीत जाळा ; प्रश्न विचारा


कानावरती फक्त आकडे फेकत सुटले ; 

तोंडाला त्या लावा टाळा ; प्रश्न विचारा


रंगदार हे सर्व निघाले रंग शेवटी

गोरा असेल किंवा काळा प्रश्न विचारा


डोळ्यांदेखत झाड वाळले तरणेताठे ;

केला तुमचा कुणी उन्हाळा ; प्रश्न विचारा


बहिण लाडकी जगते, भाऊ मरतो मुंज्या ;

या चालींना घाला आळा ; प्रश्न विचारा


स्वर्ग राहिला दोनच बोटे त्याच्यासाठी

श्रीमंतीचा कितवा माळा ? प्रश्न विचारा


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: