२६.१२.२३

*डोक्यामधील कचरा जाळून टाक पोरा

 

डोक्यामधील कचरा जाळून टाक पोरा ;
फुलवून घे निखारा झटकून राख पोरा!


पैसे नकोत त्यांना, दे धीर तू जरासा
देऊन कान त्यांची तू ऐक हाक पोरा


मार्गावरी सरळ ह्या अपघात रोज घडती
थोडा तरी असू दे जगण्यास बाक पोरा


सत्तेपुढे कुणाची चालेल का हुशारी?
युद्धात ऐनवेळी रुतणार चाक पोरा


दारात खून झाला येथेच वारसाचा ;
वाडा असा पुरातन पाडून टाक पोरा.


अभिमान काय कामी पोकळ परंपरांचा;
जगतोस तू सुखाने कापून नाक पोरा !


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: