२४.१०.२१

राजवाडा भ्रष्ट झाला,भ्रष्ट हा दरबार बापू

राजवाडा भ्रष्ट झाला,भ्रष्ट हा दरबार बापू;

थांबला गांधीगिरीने काय भ्रष्टाचार बापू?


व्यापतो जो देह सारा,खात जातो काळजाला;

देत नाही औषधाला दाद का आजार बापू.


मोठमोठ्या चार बाता स्टेजवरती सांगणारा;

मागताना दोन टक्के केवढा लाचार बापू. 


चोरलेला हार आहे,शाल आहे मारलेली;

गोड कर मोठ्यामनाने आमचा सत्कार बापू.


एक मुन्नी कोवळी अन पोरसवदा एक शीला;

मध्यरात्री नाचणारा हा कुणाचा बार बापू?


ऐकले चोरीस गेला बंद पेटीतून चष्मा;

आंधळ्यांचे स्वप्न झाले शेवटी साकार बापू!


जिंकणारा राम होतो,सत्य त्याची रामलीला;

हारणार्‍या रावणाचे कोसळे सरकार बापू.


(‘कविता-रती’दिवाळी २०११ )


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: