२७.७.१४

नाहीस कोणत्याही शोधात तू मिळाला;

नाहीस कोणत्याही शोधात तू मिळाला;
मी शोध सोडला अन्‌ माझ्यात तू मिळाला़.

प्रत्येक पाकळीला मी व्यर्थ प्रश्न केले;
मी श्वास घेतला अन्‌ गंधात तू मिळाला़.

घेऊन थांग आले कित्येक सागरांचा;
ओलावता कडा ह्या डोळ्यात तू मिळाला़.

आकाश पालथे मी घालून थांबले अन्
माझ्याच चालणाऱ्या पायात तू मिळाला

वाचीत शब्द गेले ग्रंथात कोरडे मी
साक्षात जीवनाच्या काव्यात तू मिळाला

हृदयात ऐकते मी आता तुझेच गाणे;
वक्षात स्पंदणार्‍या ठोक्यात तू मिळाला़.

धुंडाळली किती मी घनदाट  वृक्षराजी
स्वच्छंद नाचणाऱ्या गवतात तू मिळाला

माझ्याच आरशाला मी नीट पाहिले ना;
हे तेच बिंब आहे ज्याच्यात तू मिळाला!

('तरुण भारत' 29 जुलै 1984)

■ लेखन : २१ सप्टेबर १९८३

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: