२६.७.१४

असे आयुष्य झाले की मिठाने दूध नासावे

असे आयुष्य झाले की मिठाने दूध नासावे;
कशाचा धूर दाटे हा धुराला श्वास त्रासावे.

भुकेने का कळ्या खाव्या,फुलांच्या पाकळ्या खाव्या;
असा हा कोण आधाशी तरीही तोंड वासावे?

खरे का शब्द हे काळे ललाटी कोरते सटवी;
मिटेना डाग दुःखाचा किती प्रारब्ध घासावे.

सरावा जन्म हा सारा अशा कैफात स्वानंदी;
निरागस लेकरू तान्हे जसे झोपेत हासावे.

लपू दे आड प्राणाच्या तुझ्या आत्म्यातला भंगी;
मुखाला मात्र नेमाने सुगंधी भस्म फासावे.

स्वतःची वागवावी तू चिता खांद्यावरी राजा;
नवा हा कायदा आला जित्याने प्रेत भासावे.

('युगवाणी' दिवाळी 1984)
...............................

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: