२७.७.१४

ऋतू विषारी इथे असे की कळी अवेळी गळून जाते

ऋतू विषारी इथे असे की कळी अवेळी गळून जाते;
नवे बियाणे असे कसे हे उभ्या पिकाला छळून जाते.

इथेच होती खुशाल वस्ती, तिथे कसे हे स्मशान आले?
कसे कळेना तुला अडाण्या, तुझीच बुद्धी चळून जाते!

हरेक चोचीमधून केला कुणी असा रे फरार चारा?
घरात माझ्या चिल्यापिल्यांची घडी भुकेली टळून जाते.

मुक्या बिचार्‍या धुळीवरी या उगाच आरोप हा कशाला?
मुळात आहे सदोष डोके म्हणून टोपी मळून जाते!

उगाच वेड्या करू नको रे कुणावरी तू अता भरोसा;
इथे हवाही सभोवतीची तुझा गळा आवळून जाते.

कशी कळेना अजून आहे इथे वडांची सुरूच पूजा;
जिथे कधीही नवीनवेली उभ्याउभ्याने जळून जाते.

('लोकमत' दिवाळी 1984)

■ लेखन : ११ ऑक्टोबर १९८२

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: