१९.१२.०९

पुजाऱ्यांच्या दिली हाती कुणी लाठी तुकारामा

पुजाऱ्यांच्या दिली हाती कुणी लाठी तुकारामा;
विठोबाला हवी तुमची अता काठी तुकारामा.

स्फुरे का शब्दकोषांना कधी वाणी अभंगाची;
शिदोरी भोगण्याची ती हवी गाठी तुकारामा.

किनारी चंद्रभागेच्या विकत घ्या प्लॉट मोक्याचे;
तुम्हाला सांगतो तुमच्या भल्यासाठी तुकारामा.

अहो,काही खरे नाही मनी आनंद-डोहाचे;
समाधानी कपाळावर दिसे आठी तुकारामा.

कळाया चाल हेकोडी,जगाशी द्या भिडू त्यांना;
मुलांना घालता पाठी कशासाठी तुकारामा.

नकोसे होत जाणारे मरू लागे हळू नाते;
फुलांचे होउनी ओझे रुते पाठी तुकारामा.

जिवांच्या लागले मागे तगादे सावकारांचे;
किती मी सावडू हाडे नदीकाठी तुकारामा.

( पूर्वप्रसिद्धी :‘कविता-रती’दिवाळी अंक २००९ )
____________________________