२५.११.०९

तीच माझी दवा शेवटी


तीच माझी दवा शेवटी;
जा, तिला बोलवा शेवटी.

काय आजार होते कमी;
रोग लागे नवा शेवटी.

पत्र आधी सुगंधी लिहा;
पत्रिका पाठवा शेवटी.

लाजते फार कोजागरी;
तो दिवा मालवा शेवटी.

मारले 'मी'पणाने मला;
तारण्या 'तू' हवा शेवटी.

पेटलेली चिता सांगते;
चेहरा आठवा शेवटी.

देव मेले तरी द्या मरू;
माणसे वाचवा शेवटी.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: