८.११.०९

त्या साऱ्यांची पूस आसवे मी गेल्यावर

त्या साऱ्यांची पूस आसवे मी गेल्यावर;
जे माझे गातील गोडवे मी गेल्यावर.

माझी साधी ओळख तेव्हा विसरलीस तू;
आज एवढे काय आठवे मी गेल्यावर !

जीवनभर मी ह्या दु:खाला रक्त पाजले;
त्यास विचारा काय तुज हवे मी गेल्यावर.

खडा पहारा ओठांवर दातांचा असता;
जिभेस का ते गुपित बोलवे मी गेल्यावर.

जाळ आपल्या पत्रांना त्या जुन्यापुराण्या;
लिहू लाग तू मजकूर नवे मी गेल्यावर.

अपरात्रीला कधी पापणी भिजवेल उशी;
डोळ्यात चमकतील काजवे मी गेल्यावर.

जरी न आला मला तोडता कधी पिंजरा;
जाळे घेउन उडतील थवे मी गेल्यावर.