११.४.०९

भास झाला तसा, भास नाही खरा


भास झाला तसा, भास नाही खरा;
या फुलांना अता वास नाही खरा.

मान टांगू नको रोज फाशीवरी;
रेशमाचा कुणी फास नाही खरा.

कोणती राधिका सांग माझी म्हणू?
गोपिकांचा इथे रास नाही खरा.

मुक्त होण्यास तू तोडली ना कडी;
काय कैद्या तुझा ध्यास नाही खरा?

जीवना रे मला त्रास ह्याचाच की;
कोणताही तुझा त्रास नाही खरा.

आज पाने कशी हालती ना कुठे;
बंद वा-या, तुझा श्वास नाही खरा.

भूक पत्रावळी चाटते रे पुन्हा;
थुंक तोंडातला घास नाही खरा.
----------------------------------------
('तरुण भारत' 31 जुलै 1983)

■ लेखन : २८ मार्च १९८१

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: