३१.३.०९

संवेदना जरा ना प्राणात खोल काही

संवेदना जरा ना प्राणात खोल काही;
उरली न सापळ्यांच्या रक्तात ओल काही.

बेभाव घाम तैसे स्वस्तात रक्त गेले
अन् कातडीस गो-या आले न मोल काही.

तोंडास काय टाळे लावून बैसला तू;
सोसू नको मुक्याने तू आज बोल काही.

जे मान्य पावले ते संपूर्ण सत्य नाही;
बाहेर येत आहे त्यातील पोल काही.

नुसती करून चर्चा लागेल का समाधी;
कैफात जीवनाच्या झिंगून डोल काही.

माणूस तू कसा रे खातोस शेण वेड्या;
इतका नको पडू तू सांभाळ तोल काही.
---------------------------------------------
('लोकमत' दिवाळी 1985)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: