१०.३.०९

कुणाची आर्त किंकाळी? कसा आवाज हा आला?

कुणाची आर्त किंकाळी? कसा आवाज हा आला?
कशी ही पेटली होळी? नभाला झोंबती ज्वाला.

नव्या या उंब-यावरती जळे पाऊल लक्ष्मीचे ;
कुणी हे लावले आहे इथे रॉकेल मापाला?

नखाने दाबला नाही गळा तान्हेपणी आई;
अता हा फास सोन्याचा भिडे शोभून कंठाला!

मण्यांची आण घे काळ्या नको तू नाव सांगू गं;
जरी कुंकातली लाली डसे गो-या कपाळाला.

टिळे लावून रक्ताचे, भरा ओट्या निखा-यांनी;
कुणी घासात निर्दोषी जरा ‘पोटॅश’ ही घाला.

क्षणाची ही कशी पत्नी? अनंताची कशी माता?
कसे सौभाग्य हे आहे? दुधाचा कोळसा झाला!
------------------------------------------------------
('मराठवाडा' दिवाळी 1984)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: