३.१२.०८

काढा उपाय काही शोधून यार आधी

काढा उपाय काही शोधून यार आधी;
किंवा खुशाल तोडा हे बंद दार आधी.

घेऊन ते मशाली येतील जाळण्याला;
लाक्षागृहात आता खोदा भुयार आधी.

दरसाल पूर येतो वाहून गाव जाते;
द्याना अशा नदीची वळवून धार आधी.

डोळ्यात डोळसांच्या लावू नकोस ज्योती;
अंधार आंधळ्यांचा थोडा चितार आधी.

ते हार,गुच्छ नंतर सगळेच थोर झाले;
नुकतीच काल ज्यांनी लुटली बहार आधी.

जेव्हा प्रसंग येतो मज ठार मारण्याचा;
माझेच मित्र तेव्हा करतात वार आधी.
--------------------------------------------
('लोकमत' 1982)

■ लेखन : ३१ मार्च १९८१

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: