१९.१२.०८

लाजून चांदण्यांनी केला तुला इशारा

लाजून चांदण्यांनी केला तुला इशारा;
गंधात न्हात आहे रे आसमंत गोरा.

स्पर्शात मोर आले,अंगांग फ़ूल झाले;
नाजूक पाकळ्यांचा फुलतो हळू पिसारा.

आतून बाग देही बहरून येत आहे;
श्वासात गंध माझ्या करतोय येरझारा.

आले उधाण आले वक्षात रेशमाला;
नौकेत डोलताना गेलाय तोल सारा.

'हिंदोल'बासरीचा छेडून रोमरोमी;
पाहून रासलीला जातो पहाटवारा.

---------------------------------------
('तरुण भारत'दिवाळी 1979)

■ लेखन : २१ ऑगस्ट १९७९

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: