३.२.०८

वैशिष्ट्‌यपूर्ण आहे एकेक भामटा

वैशिष्ट्‌यपूर्ण आहे एकेक भामटा;
तो साव भामटा अन् हा नेक भामटा.


जनतेस भाकरीने खाऊन टाकले;
खुर्चीत खात आहे पण केक भामटा.


ज्याने न कापसाचे विकलेत बोंडही;
वटवून घेत आहे तो चेक भामटा.


ज्यांना तहान त्यांना पाणी न पाजतो;
देवास घालतो पण अभिषेक भामटा.


विश्वास नाव ह्याचे हा तज्ज्ञ घातकी;
स्नेहातही करे जो अतिरेक भामटा.


गावास आग लावी,देशासही कधी;
लागू न दे स्वत:ला पण शेक भामटा!


राज्यात कोतवाली त्यालाच लाभते;
लाचेत देत आहे जो लेक भामटा.

-------------------------------------------
('तरुण भारत' दिवाळी 1989)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: