२६.१.०८

दर्शने देतोस नुसती कोरडी का ईश्वरा

दर्शने देतोस नुसती कोरडी का ईश्वरा;
वाळवंटी तापल्या दे एक पाण्याचा झरा.

काय झाले सांग पोरी, सोसणे आहे गुन्हा;
फाटलेले पोलके अन् देह कां हा कापरा?

तूच जाशी आश्रयाला भरजरी वस्त्रांकडे;
फाटका मी सांग मागू मग कुणाला आसरा?

लावतो तू रोप मग का वाढल्यावर तोडतो;
जन्मदाता तू खरा की जीवघेणा तू खरा?

काव्य रचतो संगणक अन् यंत्र मानव दाद दे;
दूर नाही वेळ ऐसी, दूर हो रसिका जरा!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: