१८.१.०८

मठाला स्थापण्यासाठी पुन्हा येतात मंबाजी

मठाला स्थापण्यासाठी पुन्हा येतात मंबाजी;
खिशाच्या आत घालूनी विठू नेतात मंबाजी.


तुम्हाला हालता यावे, न साधे बोलता यावे;
पवित्रे टाकुनी ऐसे धरी पेचात मंबाजी.


कुमारी पाहिजे कन्या,तशी चालेल प्रौढाही;
असे कंत्राट सौख्याचे सदा घेतात मंबाजी.


मला भंडावती येथे,तुलाही गांजती तेथे;
पसरले दूरवर माझ्या-तुझ्या देशात मंबाजी.


अहो ज्ञानेश्वरा, टाका जुन्या ओव्या दुरुस्तीला;
फुकाचा मारुनी रंधा इथे देतात मंबाजी.


तुकारामा,अरे ह्यांना जरा तू हाण पैजारा;
मुखोटा लावुनी फिरती तुझ्या वेषात मंबाजी.

------------------------------------------------------
('बोली' दिवाळी 1986)

1 टिप्पणी:

अमित म्हणाले...

अप्रतिम, खरं तर आपल्यासारख्या कवीला दाद देण्यासाठी याहूनही चांगला शब्द शोधत होतो, पण माझी मजल यापलीकडे जाऊच शकली नाही. मी तुमच्या गझलांचा fan झालो आहे. पहील्यांदा तुमच्या गझलेची झलक sureshbhat.in वर पहायला मिळाली होती, अन त्यानंतर मात्र कोणती गझल सर्वात आवडली हे ठरवणं फ़ारच अवघड जात आहे. केवळ अप्रतिम.

आपल्या अशाच अनेक गझला अनुभवण्याच भाग्य सर्वांना मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.