शांतीसाठी युद्ध करू का ?
मुरली सोडुन चक्र धरू का ?
खाणारे तर गायब झाले
मीच एकटा जेल भरू का ?
काट्यावाणी सलतो नेत्री
अश्रू होउन सांग झरू का?
दिवसा, रात्री सोबत असतो
तरी पहाटे तुला स्मरू का ?
मला शोभतो तुझा उतारा
उद्या दिवाळीस वापरू का ?
मनुष्यप्राणी असेल, पण मी
पिके कोवळी मस्त चरू का ?
हलकी आहे असे ऐकले
या भिंतीचे कान भरू का ?
प्रसन्न करण्या ह्या देवांना
बकरा होउन रोज मरू . का ?
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा