२४.१०.२१

आजकाल वाटती ना मला खरे दिवस

आजकाल वाटती ना मला खरे दिवस;


यायचे कधी प्रिये आपले बरे दिवस.



देहविक्रयावरी रात्र सांज भागवी;


थंड बैसला मुका काय हा करे दिवस?



बेगडी प्रकाश अन् बेगडीच सूर्य हा-


दाटल्या तमातला आज गुदमरे दिवस



पापण्यापल्याडची झेलता व्यथाफुले


लोचनात हासऱ्या हळूच पाझरे दिवस.



वाटते पिकावरी टोळधाड यायची;


एरवी उगाच ना फार थरथरे दिवस.



रात्र उंदिरापरी काळजास कुरतडे


अन् सुळावरी जसा रोजचा सरे दिवस.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: