२२.११.१७

काही सुटे शेर

काही सुटे शेर

छातीस लाव माती,
शब्दात बांध हत्ती;
डरपोक माणसाला
गझलेत स्थान नाही!

आचरणाची पर्वा नाही;
व्याकरणाची किती
काळजी !

घास घासातला रोज ज्यांना दिला
तीच तोंडे मला चावली शेवटी.

पाण्यात मारतो का काठी हजार वेळा
दिसणार ना कधीही
सागर दुभंगलेला

गोंगाट वाढलेला आहे सभोवताली
बोलावण्या तुला मी आवाज उंच केला

तस्करीचा माल सारा पचवल्यावर
दान देण्या तोच आता कर्ण झाला!

होते नव्हते तुला दिले मी
म्हणून पोरा भीक मागतो

.
कापला गळा ज्याने तो
ताईत गळ्याचा होता
.
डोक्यास फार साल्या छळतात बातम्या
लावू नको टीव्ही तू
हातात हात दे
.
काढून टाक देवी डोळ्यावरील पट्टी
न्यायालयात कैदी
होणार रामशास्त्री
.
नव्हते कधी तुझे ते
सोडून जे पळाले
तू एकटा स्वतःचा
आहेस दोस्त सच्चा
.
शिखर गाठणे सोपे नाही
तिथे थांबणे अशक्य आहे
.

बदनामीची वाटे भीती
प्रेम करे ना कच्चा लिंबू
.
माझ्याच चेहऱ्याला
चोरून घालणारा ;
माझ्यात नांदणारा
माझा डमी असावा
.
स्तुतीपाठकांनी
सदा घेरला तू
तुला फार झोंबेल
माझी समीक्षा
.
निर्ढावला कधीचा, 
नाही दुरुस्त होणे
कोशीस पण तरीही
सोडू नका गड्यांनो
.
तू तोडतोस तारे
वाटे तुला परंतू
उरतात शेवटी का
हातात फक्त गोटे ?
.

हुबेहुब काढले आहे
नदीचे चित्र आभासी
पिताही येत ना पाणी
न येतो जीवही देता
.
न केल्या मोकळ्या गोष्टी...कधी तू बोलला नाही
मनाचा आतला कप्पा
कधी तू खोलला नाही
.
रद्दीत काढलेले जे चार शेर होते
लाइक्स काल त्यांना शंभर म्हणे मिळाल्या !
.
हे दोन-चार येथे आहेत मस्तमौला;
मुंग्या-
किड्यांप्रमाणे त्यांचा सुकाळनाही.
.
दुनिया भलती संधीसाधू
तिला कळू दे ' बाप ' भेटला !
.
अहंकार होता मला पुस्तकांचा
अखेरीस पोत्यात रद्दी
निघाली
.
चला फार मोठी प्रसिद्धी मिळाली
हजारो जणांची उधारी बुडाली
.
मुखवटा मतलबी लपेना तो
लाळ टपके कधीतरी त्याची
.
म्हणे आणला मी
पुडा मर्तिकाचा
तुझी त्यात सुद्धा असावी दलाली
.
नसे काढलेला विमा
जिंदगीचा
मुले - बायकोही उदासीन झाली
.
उच्छादी टायरखाली
कुत्र्याचे पिल्लू आले
.
पोटची पोरे उपाशी
तू जगाला घाल जेवू
.
बोलके आम्ही सुधारक
बायकोला तोंडबंदी !
.
कसा शेर सांगू तुझ्या आवडीचा
इथे शेर सारे उतावीळ माझे
.
तुमची प्रमाणपत्रे वाचून दुःख झाले ;
नालायकीत माझ्या होतो किती सुखी मी !
.
नकोस जाऊ पुढे आणखी
त्या वळणावर स्मशान आहे
.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: