२०.५.१७

जुना पुराणा देह आतला,शर्ट तेवढा नवीन आहे

जुना पुराणा देह आतला,शर्ट तेवढा नवीन आहे
जुनी हनुवटी, नाक पुरातन मेकप थोडा नवीन आहे

पैसा आहे, गाडी आहे,फ्लॅटहि छान सजवलाआहे
झाकुन घेण्या जखमी भिंती रंगमुलामा  नवीन आहे

संध्याकाळी तेच द्यायचे वरण फोडणी फ्रीज उघडुनी
भांडे लागे भांड्याला पण नाद कुणाचा नवीन आहे ?

लेक भोगते, माय भोगते, आजीनेही तेच भोगले
तपशीलाचा भेद जरासा मात्र सिनेमा नवीन आहे

शिकणाऱ्यांना झाली घाई, शिक्षकास तर त्याहुन घाई
घडवत घडवत बिघडवणारी प्रयोगशाळा नवीन आहे
( 'हंस' दिवाळी 2017 )


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: