१६.७.१६

परस्परांचा वापर केला पण बोभाटा नको वाटतो

परस्परांचा वापर केला पण बोभाटा नको वाटतो ;
फुलल्यावरती कमळालाही भवती गाटा* नको वाटतो.

अक्कलखाती किती टाकता नावे बाकी नुकसानीची
जुनी निघेना भरून हानी ,नवीन घाटा नको वाटतो.

स्थळ- काळाचे भान हरपते, केवळ उरतो आपण दोघे ;
टिकटिकणारा घड्याळातला तेव्हा काटा नको वाटतो

माझ्या हिस्स्यापुरती जागा मनात दुनिये दे कायमची ;
मला कुण्याही सिकंदराच्या धनात वाटा नको वाटतो.

वर्षामधुनी दोन - चारदा रस्ते झाडू, फोटो छापू ;
संत गाडगेबाबा तुमचा रोज खराटा नको वाटतो !

*चिखल
_______

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: