८.६.१६

पोकळ नियोजनाला मातीत घाल आता

पोकळ नियोजनाला मातीत घाल आता
अवघा प्रदेश माझा झाला बकाल आता !

अन्याय सोसताना आजा मरून गेला
कोर्टात नातवाला छळतो निकाल आता.

रानावनात आहे अंगार लागलेली
प्रत्येक झाड म्हणते माझीच लाल आता.

ओलांडली कधी ना मी हद्द आखलेली
माझ्यासवे जगा तू शिस्तीत चाल आता !

पोटातल्या भुकेने लिहिले अनंत मिसरे
कुरवाळतो कशाला शेरात गाल आता ?

कोणी करू नये रे कर्जात आत्महत्या
सोडून देश जावे घेऊन 'माल' आता !

तो श्रेय लाटण्याचा बाजार तेज यंदा
उरली शरम जराशी तेथे विकाल आता !

डोळ्यातुनी नभाच्या कारुण्य ओघळावे
भेगाळल्या भुईचे पाहून हाल आता.

 ( ' हंस ' दिवाळी २०१६ )

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: