६.५.१६

पाव माझ्या नाथराजा ह्या घडीला

पाव माझ्या नाथराजा ह्या घडीला
गाढवाच्या घाल तोंडी कावडीला

आठवाने मी तिच्या अस्वस्थ होतो...
गंध येतो माउलीचा गोधडीला

सांग तू साधेपणाने गोष्ट साधी
लावतो चौपट मसाला कोंबडीला

जोखिमांचे ऊन झेलत कोण जळतो ?
वाचवी जो तो स्वतःच्या चामडीला

मोडलेल्या खेळण्यांचा ढीग दिसला
पाहिले उघडून जेव्हा खोपडीला

पुण्य सारे खर्च झाले,पाप बाकी...
चित्रगुप्ता, बंद कर त्या चोपडीला.

घेतलेला हात हाती राहु दे तू
अर्थ येतो छान माझ्या धडपडीला

फाटक्या पदरास बांधे गाठ लक्ष्मी
लेक झुरते एक साध्या फुलझडीला

ऐक दोन्ही कान उघडे ठेवुनी तू -
नाद नसतो येत देवाच्या छडीला !

( 'अक्षर अयान' दिवाळी २०१६ )

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: