मृत्यू समोर दिसता विसरून वैर जावे;
बसण्या जवळ घडीभर मित्रास बोलवावे.
बोलून सांगण्याच्या नसतात सर्व गोष्टी;
राहून मूक तेव्हा हातात हात घ्यावे.
कारुण्य माणसाला संतत्व दान देते;
आपापल्यापरीने हृदयात वाढवावे.
पाणी उथळ कुठे अन्... गहिरे कुठे,किती हे...
जाणून नाव आहे...सोसून हेलकावे.
देहात क्षीण झाली ती ज्योत वासनेची
आत्मीय प्रेम बाकी आता तुला कळावे.
भिंतीवरील फोटो पिवळा पडेल माझा
तेव्हा तुझ्या मनातुन मी हद्दपार व्हावे.
शब्दास पाजले मी जे रक्त रोज माझे;
तू वाचशील तेव्हा डोळ्यातुनी गळावे.
( 'कविता -रती ' दिवाळी २०१४ )
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा