२४.७.१४

लक्षात येत नाही आहे कशी कहाणी

लक्षात येत नाही आहे कशी कहाणी;
पाण्यात दूध हे की आहे दुधात पाणी?

कमवून राज्य गेले तेही सुखी न झाले;
तू मारतोस डिंगा जोडून चार नाणी!

वेडास नाव 'कृष्णा' तू ठेव कोणतेही;
मांडेन प्रेम-पूजा 'मीरा' तुझी दिवाणी.

तू सूर्य उगवतीचा आकाश जिंकणारा;
गातोस तू कशाला पोरा,उदास गाणी.

भरल्या घरात अडगळ ती शोभलीच नसती;
वृद्धाश्रमात गेली आई किती शहाणी!