१३.९.१०

बेरंग बाग झाली; कोठे सुगंध गेले?

बेरंग बाग झाली; कोठे सुगंध गेले?
येथे ऋतूऋतूंनी चाळे अनेक केले.

पोलाद शब्द सगळे हे ओकतात भूसा;
की प्रस्थ वाळवीचे भलतेच माजलेले?

पंचांग सांगते की होईल खूप वर्षा;
नवजात शेत माझे संपूर्ण वाळलेले.

डोळ्यात वीज माझ्या, ओठावरी निखारे;
माझ्या उरात ताजे हंगाम पेटलेले.

आहे तसाच आणा काळा चहा गडे हो;
येथील दूध सारे बोके पिऊन गेले.

वाफ्यातले जुने हे बदलू जरा बियाणे;
तेव्हा कुठे इथेही उगवेल पेरलेले.
---------------------------------------
('आविष्कार' दिवाळी 1982)
■ लेखन : १९७९



_____________________________________






कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: