१३.१०.०९

शब्दात आग आहे; अर्थात जाळ नाही

शब्दात आग आहे; अर्थात जाळ नाही;
भाषाच कोरडी की तोंडात लाळ नाही़.

पाहून चार किरणे भुलला कसा दिशा तू?
सूर्यास्त होत आहे सध्या सकाळ नाही़.

तू वांझ गाजलेली; आई कसा म्हणू मी?
पान्ह्यात दूध नाही, काखेत बाळ नाही़.

अर्धा उभार फसला आहे नदीत जो तो;
काठावरील म्हणती पाण्यात गाळ नाही़.

रक्तात स्फोट करतो ज्वालामुखी कधीचा;
तू मानतोस तितकी छाती मवाळ नाही़.


झालीस तू सुखाची शोकेस भाग्यशाली;
काचात बंद कैदी माझे कपाळ नाही.

जगतो म्हणून त्याला झाली असेल फाशी;
प्रेतावरी बघाना काहीच आळ नाही!


दुःखात नाचणार्‍या असतील खूप वेश्या;
माझ्यातरी व्यथेच्या पायात चाळ नाही़.

खाऊ कसा चवीने मी मांस माणसांचे;
माझ्या गळ्यात देवा ती 'खास' माळ नाही!

------------------------------------------------
('अनुष्टुभ्' दिवाळी 1981)

■ लेखन : २३ मार्च १९८१


1 टिप्पणी:

अनामित म्हणाले...

vaah! pratyek sher mast!