७.७.०८

जे शोध भाकरीचा घेण्या घरून गेले

जे शोध भाकरीचा घेण्या घरून गेले;
हे वृत्त आज आले की ते मरून गेले.


नावा किती बुडाल्या त्याचा हिशोब नाही;
पण दीपस्तंभ सारे सागर तरून गेले.


गावात पापण्यांचा दुष्काळ कोरडा हा-
वाटे जरी रडावे अश्रू सरून गेले.


हा चेहरा तुझाही मळकाच वाटतो रे;
आयुष्य का तुझेही ते वापरून गेले.


वेगात खूप तूही वाहू नकोस वा-या;
फाटेल आणखी हे लक्तर विरून गेले.


मेंदूस सर्व त्यांच्या झाला लगेच लकवा;
तुमचे विचारवारे ज्यांच्यावरून गेले.

-------------------------------------------
('दृष्टी'दिवाळी 1983)

■ लेखन : २५ जून १९८३

1 टिप्पणी:

Mahesh Savale म्हणाले...

वा.....तुमचे विचारवारे ज्यांच्यावरून गेले......वा...वा...वा...