दडपणे दूर ही सारा, जरासा श्वास घेऊ द्या;
नका बांधू कुणी वारा,जरासा श्वास घेऊ द्या.
जिवाची काहिली होते गुलाबाच्या,चमेलीच्या;
जरासे ऊन नाकारा, जरासा श्वास घेऊ द्या.
असे अवतार तुमचा रे, नसे तो रेसचा घोडा;
कधी नापास स्वीकारा,जरासा श्वास घेऊ द्या.
उभे आयुष्य काट्याच्या अणीवर काढले त्यांनी,
मुखावर वाजले बारा,जरासा श्वास घेऊ द्या.
कधी तर चोपडी फेका नफा-नुकसान नोंदीची;
करा त्या बंद व्यापारा, जरासा श्वास घेऊ द्या.
जिथे चौरंग सोन्याचा,छतालाही जिथे चांदी;
सदा तो बंद गाभारा,जरासा श्वास घेऊ द्या.
असे जे मूळ दु:खाचे,असे कारण वितुष्टाचे-
अपेक्षांचा नको मारा, जरासा श्वास घेऊ द्या.
_________________________
('कविता-रती' दिवाळी 2010)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा