२.११.१७

कसली क्रांती, कसली चळवळ

कसली क्रांती, कसली चळवळ
उथळ जळाला नुसती खळखळ

मी पोटाचे चटके मोजू
की मोजावे पाठीचे वळ

नको यशाचा मिरवू टेंभा
ज्याला त्याला होते जळजळ

डोळ्यादेखत गेली गाडी
प्लॅटफॉर्मवर उरली हळहळ

नको फिरू तू स्वतःभोवती
त्या खेळाने येते भोवळ

हृदयापाशी कवळ विठोबा
तुझ्या जनीची विरही वाकळ

लढते... मरते... पुन्हा जन्मते
कुठून मिळते आशेला बळ

हुशार झाले नवीन मासे
ते ओळखती कुठे कसा गळ


मनात म्हणते ''बरा वारला''
शोकसभेची खोटी हळहळ

( 'कविता - रती ' दिवाळी  २०१९ )

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: