१६-१०-८९
प्रिय श्रीकृष्ण राऊत
सप्रेम नमस्कार
तुमचे ३०.९ चे पत्र मिळाले. ‘गुलाल’ हा तुम्ही मला भेट दिलेला तुमचा गझल-संग्रह मी अकोल्याहून आल्यानंतर ताबडतोब वाचला होता. या काव्यप्रकारात मीही लहानशी धडपड केलेली आहे, आणि अजूनही ती काही प्रमाणात चालू आहे; त्यामुळे या प्रकाराविषयी मला विशेष कुतूहल आहे. तुमचा हा संग्रह उत्सुकतेने वाचण्यामागचे हेही एक कारण आहे. आणखी एक गोष्ट : दोन तीन वर्षापूर्वी, मी अकोला स्टेशनवर उभा असताना, तुम्ही आणि नारायण कुळकर्णी कवठेकर मला भेटला होता. अकोटच्या कॉलेजने माझे परतीचे रिझर्वेशन केले नव्हते आणि मी ‘अडकून’ पडलो होतो— त्यावेळी तुम्ही तुमचे एक-दोन गझल मला म्हणून दाखवले होते. त्यांचा खोल परिणाम माझ्या मनावर झाला होता. या संस्कारामुळेही तुमच्या या संग्रहाविषयी वि्शेष उत्सुकता माझ्या मनात होती. तुमचा संग्रह मी वाचला; पण तुम्हाला पत्र मात्र लिहिले नाही. एक तर असे की, मी कोणी समीक्षक-प्राध्यापक नव्हे. माझे वाचन हे पुष्कळदा, ‘लिहिणा-याचे’ वाचन असते ! ते वाचन, एक कलावंत म्हणून मला, अनेक गोष्टी सुचवून सांगून जाते हे खरे; पण ते माझ्यापुरते असते. पण आता तुम्ही प्रतिक्रिया मला विचारीतच आहात— तेव्हा चार शब्द लिहितो.
‘गुलाल’ हा तुमचा संग्रह मला आवडला. सध्या मासिका-दैनिकांतून खूप गझला प्रसिद्ध होत असतात. या बहुतेक गझलात वृत्तदोष इतके असतात की, ते अगदी सहन होत नाहीत. तुमचे छंदावरील प्रभुत्व पाहून हायसे वाटले ! खरे म्हणजे, ही काही कौतुकाची गोष्ट नव्हे; कारण ही गोष्ट कवीकडे असलीच पाहिजे. पण ही किमान साधनाही सध्या दुर्मिळ होत चालल्यामुळे या गोष्टीचा आनंदाने आणि आवर्जून उल्लेख केला.
पुष्कळ वेळा, गझलला प्रेरणा देणारी एक मध्यवर्ती किंवा केंद्रवर्ती भूमिका असते, असे मला आढळून येते. ही भूमिका म्हणजे निवेदन करणारा एक ‘मी’ असतो. या ‘मी’ चे घटक असे : हा ‘मी’ संवेदनशील, उदात्त, दंभाची-असत्याची चीड असणारा, लौकिक हपापाने स्वार्थामागे न धावणारा, जीवनातील श्रेष्ठ मूल्यांवरील श्रद्धेमुळे एकाकी पडलेला आणि या एकूण संदर्भात अवतीभवतीच्या जगाकडे काहीसे चिडून पहाणारा. एक प्रकारचे उदात्त दु:ख या ‘मी’ च्या वाट्याला येत असते. (आणि पुष्कळदा हे दु:ख तो काहीशा आत्मकेंद्रित समाधानाने कुरवाळीत बसलेला असतो.) तुमच्याही ब-याचशा गझला याच केंद्राभोवती फिरतांना दिसतात. अशा त-हेच्या कित्येक गझला तुम्ही फारच चांगल्या लिहिल्या आहेत.विसंगती हेरण्याची आणि चांगल्या अर्थाने वक्तृत्वपूर्ण उठाव देण्याची उत्तम शक्ती तुमच्या शैलीत आहे. तसेच, क्षुद्र स्वार्थाच्या, हपापाच्या पलीकडच्या उदात्त जगण्याचे खोल आकर्षण तुम्हाला आहे. ही सर्व तुमच्या या गझलांतील जमेची बाजू आहे. परंतु इथे एका गोष्टीकडे मी तुमचे लक्ष वेधू इच्छितो. अशा त-हेच्या गझला वाचताना नंतर नंतर एकसुरीपणा जाणवतो. जीवन-दर्शनात तोचतोपण आल्यामुळे, शैलीतील वक्तृत्वाचे घटक काहीशा भडकपणे स्वत:कडे लक्ष खेचून घेण्याचा प्रयत्न करु लागतात! उपरोधामागची सात्त्विक प्रेरणा फिकी होऊन, त्यात एक प्रकारचा नाटकी आवेश शिरू लागतो; आणि हळूहळू यशस्वी लकबींची हुशारीने केलेली पेरणी असे स्वरूप लेखनाला येण्याची शक्यता निर्माण होते. तुमचे असे झालेले नाही-पण तसे पुढे होण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणूनच, या भूमिकेच्या किंवा या लाडक्या भूमिकेच्या चौकटीबाहेरचे अनुभव व्यक्त करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. नाहीतर, शौर्याची जागा केवळ हातवा-यांनी घ्यावी, तसे पुढे होईल! तुमच्याच शब्दात सांगायचे झाल्यास
‘‘आत्मकेंद्री फार झाले खानदानी आरसे;
त्यांत नाही स्पष्ट आता दु:ख माझे फारसे!’’
असे होऊ शकेल!
तुमचे काही गझल मला अतिशय आवडले. ते असे :
हासतो जरी;
आजन्म रोज ज्यांनी;
उल्लेख टाळलेल्या;
काढा उपाय काही;
आसवांची कशी रीत;
खाणीत कोळशांच्या;
कशी वेळ आली...
ही यादी खूप वाढवता येईल— कारण एकूणच पुस्तक मला फार आवडले आहे. माझ्याविषयी अगत्य दाखवून तुम्ही हे पुस्तक मला भेट म्हणून दिलेत याचे फार बरे वाटले. तुमच्या गझलांचा नवा संग्रह वाचायला मी उत्सुक आहे.
पत्र पोचल्याचे कळवा.
तुमचा
-मंगेश पाडगावकर
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा