पेज

२३.१०.२१

नाही कधी कुणाची होणार राजनीती

नाही कधी कुणाची होणार राजनीती;

वेश्येपरी बदलते आचार राजनीती.

प्रेमात रोज सौदा,मैत्रीत रोज धोका;
करणार भावनांचा व्यापार राजनीती.

साडी असेल ह्याची,चोळी असेल त्याची;
मांडेन कुंकवाचा बाजार राजनीती.

तू पाय चाट वेड्या तेव्हा मिळेल पेढा;
लाचार मस्कर्‍यांना आधार राजनीती.

पत्नी-मुलास देते सत्तेपुढे बळी अन
जाळून टाकते ही घरदार राजनीती.

सडवून धान्य त्याची गाळेन मस्त दारू;
लुटवून देत नाही कोठार राजनीती.

(‘कविता-रती’ दिवाळी २०१२)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा