२२.११.१७

तुला पाहिजे तसे वाग तू

तुला पाहिजे तसे वाग तू ;
भल्या बु-याला लाव आग तू.

उगाच खोटी भीड कशाला ;
हक्क आपला तिला माग तू.

कुठे अचानक गायब झाले ;
त्या सत्याचा काढ माग तू.

जमेल जेथे मैत्र जिवाचे ;
तिथे फुलांची लाव बाग तू.

मनात नाही त्याच्या काही ;
नकोस त्याचा धरू राग तू.

अजून नाही रात्र संपली ;
सक्त पहारा देत जाग तू.

(असंग्रहीत/प्रसिद्धी : ‘कविता-रती’ दिवाळी अंक २००६)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: