२०.११.०८

गोऱ्या तुझ्या रुपाने भलती कमाल केली

गोऱ्या तुझ्या रुपाने भलती कमाल केली;
बघण्यास आरशाला दृष्टी बहाल केली.

तू फूल मागण्याला थोडा उशीर केला;
ओसाड बाग त्यांनी नुकतीच काल केली.

अंधार जीवनाचा तेव्हा प्रसन्न झाला-
जाळून जीव माझा जेव्हा मशाल केली.

रेड्यास रोज देण्या उपसून ज्ञानगंगा;
त्याच्याच कातडीची आम्ही पखाल केली.

संन्यास घेतल्याने बाहेर जिंकलो पण
आतून वासनांनी हळुवार चाल केली.

हाती भविष्य ज्याच्या,काळास त्या नमावे;
मांडून कुंडलीला तू चूक काल केली.

समजू नकोस पडला पाऊस कुंकवाचा;
मी रक्त शिंपडोनी ही वाट लाल केली.
----------------------------------------------
('तरुण भारत' दिवाळी 1984)

■ लेखन : २५ डिसेंबर १९८३

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: