पेज

१७.१२.०७

भेटली तू मला वादळासारखी

भेटली तू मला वादळासारखी;
प्रेरणेने दिलेल्या बळासारखी.


मोकळे बोलणे, हासणे मोकळे;
पारदर्शी प्रिये तू जळासारखी.


वाटली तू सुगंधी फुलांची कधी,
अन् कधी तू उन्हाच्या झळासारखी.


आत माझ्या मनी खोल तू बैसली:
मासळीच्या मुखाला गळासारखी.


जीवनाचे दुखी झाड झाले सुखी;
लागली त्यावरी तू फळासारखी.


हात हाती दिला तू विजेचा मला;
फेकली संकटे मी मळासारखी.

आज काळास हे काय झाले असे-
संपली रात्र माझी पळासारखी.