पेज

१९.१.२२

*शेरात बांधले मी काही नवीन नाही

शेरात बांधले मी काही नवीन नाही

इमला असेल माझा,माझी जमीन नाही.


नाही हयात पण तो स्वस्तात धान्य खातो

सामान्य माणसाची ती भूक हीन नाही


चालून पाय थकले,निजले रुळावरी जे

जगणे कह्यात त्यांच्या मरणे अधीन नाही.


ती सावळी जराशी झाली तुझ्यामुळे रे

चारित्र्य राधिकेचे कृष्णा,मलीन नाही


मेकप करा कितीही  दिसते कुरूप वास्तव

आयुष्य हा नटीचा रंगीत सीन नाही


औद्धत्य छेडतो का माझ्यातल्या तुक्याचे

वरतून नम्र दिसतो आतून लीन नाही


येती अजून माझ्या डोळ्यात दोन अश्रू

माणूस राहिलो मी झालो मशीन नाही

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा