आत्मकेंद्री फार झाले खानदानी आरसे;
त्यात नाही स्पष्ट आता दु:ख माझे फारसे.
त्या तिथे जन्मोत्सवाला रीघ भारी लागली;
एकटे हे फक्त माझ्या वेदनांचे बारसे.
भाषणाने एकदा आभार माझे मानले;
पापणीला आसवांचा थेंब कोठेही नसे.
पारखे होती मला खोट्या सुखाचे सोबती;
कोणतेही स्वप्न जेव्हा आज डोळ्यांना डसे.
आततायी नाटकांच्या होत होत्या तालमी;
सोयऱ्यांच्या हुंदक्यांना का तरी यावे हसे?
सांजवेळी संगतीला एक नाही पाखरू
तेरवीच्या पंगतीला खूप आली माणसे.
('तरुण भारत'वासंतिक 1982)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा