Related Posts Plugin for WordPress, Blogger...
Related Posts Plugin for WordPress, Blogger...
Related Posts with Thumbnails

*श्रीकृष्ण राऊत विशेषांक*

मौलिक मराठी गझललेखनाकरिता बांधण जनप्रतिष्ठानच्या'जीवनगौरव' पुरस्काराने आणि यू.आर.एल फाउंडेशनच्या 'गझल गौरव' पुरस्काराने सन्मानित ज्येष्ठ गझलकार श्रीकृष्ण राऊत यांच्या गझलांविषयी वाचा श्रीकृष्ण राऊत विशेषांक येथे *श्रीकृष्ण राऊत विशेषांक* वाचा

२६.९.१९

'गुलाल आणि इतर गझला' मधील ग्रामजीवनाचे प्रतिमात्मक संसूचन : बाबाराव मुसळे

ग्रामजीवनाची सखोल जाण आणि अनागर संस्कृतीचे सजग भान असलेले ख्यातनाम कादंबरीकार बाबारावजी मुसळे
यांनी ' गुलाल आणि इतर गझला ' ह्या माझ्या गझलसंग्रहातील प्रतिमांचा घेतलेला तपशीलवार धांडोळा...
बाबारावजी, माझी गझल तुमची कायम ऋणी आहे.
■■
भूमिका :
.
श्रीकृष्ण राऊत यांच्या गुलाल आणि इतर गझला या गझलसंग्रहातील गझलांचा अभिव्यक्ती वा आशय या दृष्टीने विचार करावयाचा येथे अजिबात मानस नाही.श्रीकृष्ण राऊत हे मान्यताप्राप्त गझलकार आहेत. त्यांच्या गझलांचा अनेक अभ्यासकांनी वेगवेगळ्या अंगांनी अभ्यास केलेला आहे. त्यामुळे मी या लेखापुरती एक मर्यादित भूमिका ठरवून घेतलेली आहे. हाल-सातवाहनाच्या गाथा सप्तसती पासून ते आजवरच्या अनेक कवींनी आपापल्या काव्यात ग्रामीण जीवनातील अनेकानेक प्रतिमांचा कौशल्यपूर्ण वापर केलेला आहे. अर्थात प्रा. श्रीकृष्ण राऊतही त्याला अपवाद असण्याचे कारण नाही. त्या दृष्टीने प्रा. राऊतांच्या संग्रहातील ग्रामीण जीवनाचे संसूचन करणार्‍या प्रतिमांचा धांडोळा घेण्याचा केलेला हा प्रयत्न.
.
प्रतिमांविषयी थोडेसे :
.
प्रतिमा ही कवीच्या व्यक्तिमत्वाचा एक अनिवार्य भाग असतो. ती एक रूपकक्रिया घडविणार्‍या शब्दसमुहाच्या रूपात प्रगट होते. वेगवेगळ्या समीक्षकांनी प्रतिमेच्या व्याख्या करताना तिच्यातून व्यक्त होणार्‍या अनुभवाला विशेष महत्त्व दिलेले दिसते. हा अनुभव ञ्ृक, श्रृती, गंध, रूची, स्पर्श असा पाच संवेदनांशी निगडित असतो. कधी कधी केंद्रीय स्थानी असणारी एक प्रतिमा आणि तिच्या अर्थाला व्यापक करणार्‍या पूरक प्रतिमा मिळून जो अनुभव येतो, त्यामुळे कवितेच्या अर्थबोधाची पातळी वाढते. प्रतिमांमुळे आशयाचे सौंदर्य अधिक खुलून उठते. प्रतिमा ही रूपकाशी जवळचे नाते सांगते असे मानले गेले तरी मुख्यत: अलंकार हे लक्षणशक्तीशी संबंधित असतात, तर प्रतिमा ह्या व्यंजनाशक्तीसाठी उद्घोषणा करतात. मध्ययुगात समूहाला विशेष महत्त्व होते. म्हणून त्याकाळी अनुभवसिद्घीसाठी अलंकाराचा अधिक वापर होत गेला. पण आधुनिक युगभान हे व्यक्तिकेंद्री झाले आहे. त्यामुळे अलीकडच्या काव्य लेखनात प्रतिमांचे महत्त्व वाढले.
श्रीकृष्ण राऊतांची गझल आणि विविध प्रतिमा : प्रा. श्रीकृष्ण राऊतांनी गुलाल आणि इतर गझला या गझलसंग्रहात अनेक प्रकारच्या प्रतिमांचा वापर केलेला आहे. त्यातील काही स्थूल प्रतिमा प्रकारांचा येथे मुद्दाम उल्लेख करावयाचा आहे.
.
रंगप्रतिमा :
.
सौभाग्य रेखणारे कुंकूच भासले जे, कोण्यातरी मढ्याचा तोही गुलाल होता. (गुलाल)
.
स्पर्शप्रतिमा :
.
अंगांग गौरकांती नाजूक मी चमेली, शृंगारल्या उन्हाने मजला विकार झाला. (आषाढ)
.
गंधप्रतिमा :
.
चुकवू किती सरींचा वर्षाव हा सुगंधी, आषाढ यौवनाचा जर जाणकार झाला. (आषाढ)
.
दृक प्रतिमा :
.
भिंती चतूर त्यांच्या सांभाळती तिजोर्‍या, पाहून माणसाला ती लागती कवाडे. (प्रचिती)
.
नादप्रतिमा :
.
हिंदोल बासरीचा छेडून रोमरोमी, पाहून रासलीला जातो पहाटवारा. (रासलीला)
.
श्रृती प्रतिमा :
.
ऐकवू नकोस तू तुझी नवी नवी गझल, भोवताल मंडळी इथे महान चोरटी. (भोवताल)
.
रसप्रतिमा :
.
खाऊ कसा चवीने मी मांस माणसांचे, माझ्या गळ्यात देवा ती खास माळ नाही. (माळ)
.
रूपप्रतिमा :
.
माझ्याच आरशाला मी नीट पाहिले ना, हे तेच बिंब आहे ज्याच्यात तू मिळाला.
 (बिंब)
.
लयप्रतिमा :
.
ज्यांची उद्या भरारी छेदेला अंबराला, संचारली हवा ती ह्या पाखरात माझ्या. (वीज)
.
कृतीप्रतिमा :
.
करा बंद वर्षा, पिके तर जळाली. (पुजारी)
 हे अगदी काटेकोरपणे केलेले प्रतिमांचे वर्गीकरण नाही. वेगवेगळ्या प्रतिमांमधून व्यक्त होणार्‍या भावांवरून असे आणखी काही प्रकार कल्पिता येतील. थोडक्यात म्हणजे प्रा. श्रीकृष्ण राऊत यांची गझल अनेकविध प्रतिमांनी गजबजलेली आहे. हे सुजाण वाचकांच्याही सहज लक्षात येईल.
.
ग्रामजीवनाची व्याप्ती :
.
खोल ओली पडे ते पीक उत्तम । उथळाचा श्रम वाया जाय ॥ ही तुकारामांची प्रतिमात्मक सूचकता किंवा एरव्ही तरी खवणेयाच्या गांवी । पाटाऊवे काय करावी । हा ज्ञानेश्वरांचा सिद्घांत मनुष्यमात्राच्या स्वभाववैशिष्ट्यांचे निर्देशक आहेत. या दोन्ही ठिकाणी त्यांनी ग्रामजीवनाचे संदर्भ दिलेले आहेत. प्रा. श्रीकृष्ण राऊत यांनी गाव, घर, घरातील वस्तू, अन्न-वस्त्र, पेये, साजश्रृंगार, रूढी-परंपरा, नाती-गोती, कृषी, प्राणी, पक्षी, किटक, निसर्ग इ. अनेक प्रतिमांचा वापर केलेला आहे. ह्यातून गावांकडच्या जनजीवनाचा, निसर्गाचा प्रतिमाभूत व्यंग्यार्थ वाचकांना अंतर्मुख केल्याशिवाय राहत नाही. या अर्थाने ज्ञानेश्वर-तुकारामादिंचे ते वारसदार ठरतात.
.
गझलकारांचा एकूणच गझल लेखनाविषयी दृष्टीकोन :
.
वास्तविक प्रा. राऊत यांचे वास्तव्य नवजात महानगरात म्हणजे अकोल्यात. त्यामुळे गावाचा, गावाकडच्या माणसांचा, निसर्गाचा त्यांच्याशी कितपत संपर्क असेल असे या विषयासंदर्भाने हा गझल-संग्रह वाचण्यापूर्वी मला वाटले. पण जेव्हा गझल वाचल्या तेव्हा काही गझलांनी मला अस्वस्थ केले. काटे, बियाणे, घास, तेल, कोळसा, प्रसंग, वाढ या काही गझला. त्या गझलांतून गाव अन गावांशी संबंधित अनेक बाबी त्यांच्या रक्तात भिनलेल्या दिसतात. वानगीदाखल त्यांच्या वेगवेगळ्या दोन गझलांतले दोन शेर मुद्दाम देतो.
.
कर्जात शेत गेले, व्याजात बैल गेले
चालेल चाक गेले, शाबूत आख ठेवा । (काटे)
.
वाफ्यातले जुने हे बदलू जरा बियाणे
तेव्हा कुठे इथेही, उगवेल पेरलेले (बियाणे)
.
 माणसांच्या सुखदु:खाविषयी वा एकूणच गझल निर्मिती विषयी त्यांनी आपली भूमिका स्पष्टपणे मांडलेली आहे. ते म्हणतात -
.
मी पुजारी माणसांचा, दु:खितांचा भक्त मी
आंधळ्यांना वाट दावी, तीच माझी अर्चना (अर्चना)
.
जी जाळते मला ती माझीच आग आहे
आता कवेत घेणे कवितेस भाग आहे (डाग)
.
 म्हणूनच त्यांची गझल ग्रामीण, नागरी अशी उभयसंचारी आहे. ती अवघ्या माणसांचीच आहे. जेवढ्या समरसतेने ती शहरी माणसांना उघडी पाडते. तेवढ्याच वक्रोक्तीपूर्ण शैलीने ती ग्रामीण माणसांचेही वाभाडे काढते. काय नागरी, काय ग्रामीण? माणसे तशी इथून तिथून सारख्याच वृत्तीची. दोन्हीकडच्या माणसांच्या रक्ताचा रंग लालच. ज्यात स्वार्थ, द्बेष, अहंकार, असूया, शोषकवृत्ती इ. खळांची व्यंकटी भरलेली.
.
ग्राम जीवनाशी संबंधित प्रतिमा :
.
१. गाव :
.
त्यांच्या काही गझलात गाव, वस्ती यांचे उल्लेख आले आहेत. पैकी काही -
.
जिद्दीत काल ज्यांनी वस्ती उजाड केली, गावात त्याच जाता होतात हे नवाडे (प्रचिती)
.
गावात पापण्यांच्या दुष्काळ कोरडा हा (लकवा),
.
कधी गावात खातो हा सुकामेवा चवीने अन्‌
कधी कुरणात चरण्याला घुसे शेतात मंबाजी
(मंबाजी)
.
 दुष्काळग्रस्त गावे देतात ह्या शुभेच्छा  होवो सदा सुखाचा तुमचा प्रवास राजे (शुभेच्छा)
.
भुलतात मार्ग दिवसा, पडतात रोज चकवे  थडग्यातल्या घरांनी केली स्मशान-वस्ती (वस्ती)
.
यांच्या करामतींना नाही अशक्य काही पोरीस अर्धकच्च्या आणेल न्हाण वस्ती (वस्ती)

या गझलेत वस्ती हा शब्द अन्त्यमक (रर्दाफ) म्हणून आलेला आहे. त्यामुळे या गझलेतील एकूण सहा शेरांपैकी प्रत्येक शेर वस्तीच्या वैशिष्ट्यांसंदर्भात महत्त्वाचा आहे. विस्तारभयास्तव त्यातले येथे फक्त दोन घेतले.
.
इथेच होती खुशाल वस्ती
तिथे कसे हे स्मशान आले?
(पूजा)
.
हे संदर्भ मला विशेष वाटले. कोणा मंबाजी, राजेंनी स्वत:च्या स्वार्थापायी गावाचे-वस्तीचे कसे स्मशान केले, तरीही गावे त्यांना शुभेच्छा देण्याचा मोठेपणा दाखवितात ही बाब गझलकारांनी प्रभावीपणे दाखविली आहे.
.
२. घर :
.
घरे गावात असतात, तशी नगरातही असतात. पण या लेखातील संदर्भांकित घरे मात्र गावाकडचीच निवडण्यावर कटाक्ष आहे, पण कधी कधी घर या प्रतिभेतून एकाचवेळी ग्रामीण / शहरी भावही प्रकट होतांना दिसतात. ही बाब वाचकांनी विशेषत्वाने लक्षात घ्यावी.
.
ठेवून काळजाला शिंक्यावरी घरी अन्‌ मग सांत्वनास माझ्या आला रूमाल होता
 (गुलाल)
.
झेलुन घेत थुंकी फळतात फुलझाडे  का मोडक्या घराला छळतात राजवाडे  (प्रचिती)
.
नाही दिवा जरीही पडक्या घरात माझ्या मी सूर्य पाळलेला आहे उरात माझ्या (वीज)
.
भुलतात मार्ग दिवसा पडतात रोज चकवे  थडग्यातील घरांनी केली स्मशान वस्ती  (वस्ती)
.
घराघरात राहणार्‍या माणसांचा कोरडेपणा, लाचारी दाखवितांना अपवादात्मक काही माणसे स्वाभिमानी वृत्तीची कशी असू शकतात हे या प्रतिमेतून व्यक्त होते.
 घर म्हटले की, घराच्या भिंती, कवाडे, चूल, राख, दिवा, कंदिल, वात, भिंतीचे खिंडार हे सारे काही ओघानेच आले. या प्रतिमांचाही श्रीकृष्ण राऊत यांनी खुबीने वापर केलेला आहे.
.
भिंती चतूर त्यांच्या सांभाळती तिजोर्‍या पाहून माणसाला ती लागती कवाडे  (प्रचिती)
.
अभिजात तोतयांनी केली हवेत भेसळ माझ्या मुक्या चुलीच्या देहात रक्त नासे
(शिकार)
.
पोटात माणसांनी काटे कसे भरावे? चालेल चूल गेली, शाबूत राख ठेवा (काटे)
.
नाजूक फार सध्या आहेस रे दिव्या तू  पेलेल का तुला जळती मशाल हाती (वसा)
.
जगतो तरी कशाला कंदील फोडलेला? त्याच्या उरात नक्की पेटून वात आहे (झेंडा)
.
तुझ्या श्वासातुनी आता गळाया लागली माती
उभे खिंडार भिंतीचे तसा तू वाटला मित्रा (मित्रा)

३. अन्न-पेये :
.
आहे तसाच आणा काळा चहा गडे हो येथील दूध सारे बोके पिऊन गेले
 (बियाणे)
.
खाऊन घे गिधाडा तू एक प्रेत माझे अनुवाद भाकरीचा चालू दिशात दाही
(अनुवाद)

तोंड काळे करून या भाकरी मग भुजून घ्या (देव)
.
जे शोध भाकरीचा घेण्या घरून गेले
हे वृत्त आज आले की ते मरून गेले (लकवा)
.
घाऊक आजचा हा बाजारभाव ताजा स्वस्तात रक्त मिळते भाकर महाग आहे ! (डाग)
.
जनतेस भाकरीने खाऊन टाकले खुर्चीत खात आहे पण केक भामटा (भामटा)
.
रात्र खूप उलटली व दूर राहिले शहर
घ्या धकून आज हीच गावरान चोरटी
(भोवताल)
.
पोचली भाकरी अंबराच्या वरी
थांब भावा, पुढे तू वधारू नको
(डाव)
.
या गझलांतून आलेली भाकर, काळा चहा, दूध केक, गावरान दारु ह्या प्रतिमांनी मानवी वृत्ती प्रवृत्तींची सापेक्ष दखल घेतली जाते.

४.वस्त्र प्रावरणे :
.
पदर, टोपी, पोलके अशी काही मोजक्याच प्रतिमा येथे आढळतात. पण त्यांनीही त्या त्या गझलेचा बाज समर्थपणे तोलून धरलेला आहे. मराठी गझलेसाठी आवश्यक असलेल्या प्रतिमा, प्रतीके, रूपके, संकेत महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वातावरणात भरपूर आहेत. गझलेला मराठी मातीचाच सुगंध आला पाहिजे हे सुरेश भटांचे म्हणणे (नवोदितांचा हुंकार - सप्टें 93) संयुक्तिक आहे. याची जाण श्रीकृष्ण राऊत यांनाही आहे. म्हणूनच त्यांच्या ग्रामजीवनाशी संबंधित प्रतिमांमध्ये विविधतेसह सहजता आहे.

वस्त्र-प्रावरणासंबंधी काही गझलांचे शेर पाहा -
.
आला कसा फुलोरा गेली झुकून फांदी पदरातही लपेना इतका उभार झाला (आषाढ),
.
मुक्या विचार्‍या धुळीवरी या उगाच आरोप हा कशाला? मुळात आहे सदोष डोके म्हणून टोपी मळून जाते
(पूजा)
.
काय झाले सांग पोरी सोसणे आहे गुन्हा फाटलेले पोलके अन्‌ देह कां हा कापरा? (दाद)
.
५. साज श्रृंगार :
.
 सौभाग्य रेखणारे कुंकूच भासले जे  कोण्यातरी मढ्याचा तोही गुलाल होता (गुलाल)
.
मण्यांची आण घे काळ्या, नको तू नाव सांगू गं
जरी कुंकातली लाली डसे गोर्‍या कपाळाला (कोळसा)
.
हसे आज कुंकू गमावून लाली  (पुजारी)
.
समजू नकोस पडला पाऊस कुंकवाचा
मी रक्त शिंपडोनी ही वाट लाल केली
(रक्त)
.
या गझलांतील कुंकू किती फसवे आहे हे वेगळे सांगण्याची आवश्यकता आहे काय?
.
६. रूढी-परंपरा :
.
 ग्रामीण जीवनात सण, वार, उत्सव, धार्मिक-सामाजिक परंपरा यांना फार मोठे स्थान आहे. श्रीकृष्ण राऊतांना ते टाळणे शक्य झाले नाही हे स्वाभाविकच आहे.
.
टिळे लावून रक्ताचे, भरा ओट्या निखार्‍यांनी
 कुणी घासात निर्दोषी जरा पोटॅश ही घाला (कोळसा)
.
पोथीत पेरती हे संदेश लाचखाऊ
आत्म्यास राहण्याचे हे मागतात भाडे (प्रचिती)
.
हुंदक्याचे फूल काठी अंतरंगी स्वस्तिके आज दिंडी आसवांची येत आहे लोचना.
(दिंडी)
.
नव्या या उंबर्‍यावरती जळे पाऊल लक्ष्मीचे कुणी लावले आहे इथे रॉकेल मापाला (कोळसा)
.
कुणाची आर्त किंकाळी? कसा आवाज हा आला? कशी ही पेटली होळी? नभाला झोंबती ज्वाला । (कोळसा),
.
जमलेच तर तुला तू घ्यावा वसा सतीचा  पोथी तशी कुणीही घेते छिनाल हाती (वसा)
.
कशी कळेना अजून आहे इथे वडांची सुरूच पूजा
जिथे कधीही नवीन केली उभ्या उभ्याने जळून जाते
(पूजा)
.
पाखरांच्या पहा बैसल्या पंगती
जहर दाण्यांवरी तू फवारू नको
(डाव)
.
७. ग्रामजीवनाशी संदर्भित इतर प्रतिमा :
.
कोंडवाडा-
.
प्रचिती अगाध ज्यांच्या नाठाळ कुंपणांची ते हेच सर्वसाक्षी साक्षात कोंडवाडे
(प्रचिती)
.
पखाल :
.
रेड्यास रोज देण्या उपसून ज्ञानगंगा त्याच्याच कातडीची आम्ही पखाल केली (रक्त)
.
पैजारा :
.
तुकाराम अरे ह्यांना जरा तू हाण पैजारा  मुखोटा लावुनी फिरती तुझ्या वेषात मंबाजी
(मंबाजी)
.
पंचांग :
.
पंचांग सांगते की होईल खूप वर्षा । नवजात शेत माझे संपूर्ण वाळलेले । (बियाणे)
.
पालखी/गोणी :
.
गोण्यात कातडीच्या लादून खूप ओझी
हे पालखीत गोटे केव्हा चढून गेले? (अंत्ययात्रा)
.
फाशी :
.
मान टांगू नको रोज फाशीवरी रेशमाचा कुणी फास नाही खरा
(घास)
.
कुंपण :
.
कुंपणांनी दिला वावरांना दगा
सांड मोकाट लाखो चरू लागले
(वाढ)
.
मोरी :
.
पापे धुऊन अमुची झाली गढूळ गंगा  आहे कशी कळेना तुमची पवित्र मोरी (गंगा)
.
ताट :
.
मी किती श्रीमंत आहे काय सांगू? जवळ माझ्या फक्त तुटके ताट राजा !
(राजा)

८. कृषी :
.
जैसे जे क्षेत्री पेरिजे  तें वांचूनि आण न निपजे
कर्मफळाच्या संदर्भात ज्ञानेश्वरांनी क्षेत्राची ही प्रतिकात्मक पेरणी ज्ञानेश्वरीत केली आहे. तशीच श्रीकृष्ण राऊतांनीही शेती, पिके, शेतीची उपकरणे, बियाणे, कर्ज, बैल, गाई, पक्षी, किटक, रोग इ. अनेक प्रतिमा वापरल्या आहेत. खरं तर सर्वाधिक प्रतिमा जवळपास वीसेक गझलांत (या संग्रहातील समाविष्ट 69 गझलांपैकी) कृषी संबंधीच आहेत. ते पाहणे मनोरंजक तर ठरेलच, पण वाचतांना त्यातील काही शेर अंर्तमुखही करून जातील -
.
वाटे पिकावरी टोळधाड यायची  एरवी उगाच ना फार थरथरे दिवस  (दिवस)
.
गर्भार दूर हेले, गोठ्यात वांझ गाई  चालेल दूध गेले,
शाबूत ताक ठेवा । (काटे)
.
येणार पीक बहिरे मातीत भामट्यांच्या चालेल पेरलेली शाबूत हाक ठेवा (काटे),
.
पंचांग सांगते की होईल खूप वर्षा नवजात शेत माझे संपूर्ण वाळलेले (बियाणे)
.
डोळ्यात वीज माझ्या ओठावरी निखारे  माझ्या उरात ताजे हंगाम पेटलेले (बियाणे)
.
वात्सल्य कोणते हे आहे मला कळेना
ही वासरास खाते दररोज गाय आता (अंदाज)
.
रक्ताळल्या पहाटे उगवेल सूर्य नक्की डाल्यात कोंबड्याला कोणी खुशाल झाका (पहाट)
.
खाऊन घे गिधाडा,
तू एक प्रेत माझे
अनुवाद भाकरीचा
चालू दिशात दाही
(अनुवाद)
.
कुंपणांनी दिला वावरांना दगा
सांड मोकाट लाखो चरू लागले
(वाढ)
.
गावातळात येतो आवाज एक ऐका त्या हंबरून गाई देतात रे पुरावा (तेजाब),
.
भरले कणीस माझे कोणी खुडून नेले? हंगाम संपलेला पक्षी उडून गेले । (अंत्ययात्रा)
.
करा बंद वर्षा
पिके तर जळाली । (पुजारी)
.
ऋतू विषारी इथे असे की कळी अवेळी गळून जाते
नवे बियाणे असे कसे हे उभ्या पिकाला छळून जाते .
(पूजा)
.
योजना आखुनी जाळतो का मला? भ्रष्ट ना मी तुझ्या कापसासारखा (सर्व),
.
ज्याने न कापसाचे विकलेत बोंडही वटवून घेत आहे तो चेक भामटा
(भामटा)
.
कधी गावात खातो हा सुकामेवा चवीने अन्‌
कधी कुरणात चरण्याला घुसे शेतात मंबाजी
(मंबाजी)

आणि हा शेवटचा शेर -
पाखरांच्या पहा बैसल्या पंगती जहर दाण्यांवरी तू फवारू नको (डाव).

९. निसर्ग :
.
इथे मी विचारात घेत असलेला निसर्ग हा गाव, पिके, झाडे यांच्या संदर्भातला आहे. तो सौम्य तसा रौद्रही असतो, विधायक तसा विध्वंसकही असतो. तो कसाही असला तरी त्याच्या असण्यावरच जगणे निर्भर असते. म्हणून तर आपण त्याची विविधप्रकारे पूजा करतो. श्रीकृष्ण राऊत काय म्हणतात ते पाहू -
.
पंचांग सांगते की होईल खूप वर्षा । नवजात शेत माझे संपूर्ण वाळलेले (बियाणे),
.
चिखलात खोल फसले सगळेच पाय आता
मातीस सापडेना काही उपाय आता (अंदाज)
.
दरसाल पूर येतो वाहून गाव जाते । द्याना अशा नदीची वळवून धार आधी (प्रसंग)
.
शेवाळल्या नद्या अन्‌ झाले गढूळ पाणी आता तहान माझी सांगू कशी झर्‍याला ?
(सामील)
.
आहे विचार अमुचा झाडास भेट द्यावी येथील माणसांची काढून साल हाती (वसा),
.
बघतो असा कसा हा पाऊस येत नाही
मी वीज पेरली रे या वावरात माझ्या (वीज)
.
करा बंद वर्षा
पिके तर जळाली (पुजारी)
.
अर्धा उभार फसला आहे, नदीत जो तो काठावरील म्हणती पाण्यात गाळ नाही (माळ)
.
ऋतू विषारी इथे असे की कळी अवेळी गळून जाते
नवे बियाणे असे कसे हे उभ्या पिकाला छळून जाते
(पूजा)
.
नव्याने पेटला वणवा, जळाले कोंब आशेचे पुन: रानात पोटाच्या भुकेला चावला चारा (पारा)
.
पूर देतो कुणा, थेंबही ना कुणा
धूर्त झालास तू पावसासारखा
(सर्व)
.
भेटली तू मला वादळासारखी  प्रेरणेने दिलेल्या बळासारखी (पारदर्शी)
.
जीवनाचे दुखी झाड झाले सुखी
लागली त्यावरी तू फळासारखी  (पारदर्शी)
.
समारोप :
.
मी केलेला हा उपद्व्याप वाचकांस, अभ्यासकांस निरर्थक वाटण्याचीच शक्यता अधिक आहे, पण यातून एक गोष्ट सिद्घ होते. जे कोणी नागरवासी कवीमनाचे असतील, त्यांच्यासाठी ते जिथे कुठे राहत असतील स्वाभाविकपणेच तेथला सभोवताल त्यांना सदैव खुणावतो. मात्र जरी ते नागर संस्कारांतले असतील तरी त्यांनी कधी न पाहिलेला ग्रामीण सभोवतालही त्यांना आकर्षून घेतो. फुकाचे ते लुटा सार । व्हारे अमर सदैव । असं तुकारामांनी हरीनामाबद्दल म्हटले असले तरी त्यांचे ते विधान ग्राम संस्कृतीलाही लागू पडते. यातून गावाकडे पाहण्याची नागर कवींची  दृष्टी सजग, सहृदय, सद्भावनायुक्त होऊ शकते. ज्या गांभीर्याने श्रीकृष्ण राऊत यांनी 'गुलाल आणि इतर गझला ' या संग्रहात ग्रामजीवनातील संप्रेरक प्रतिमांचा वापर आपल्या गझल लेखनासाठी केला. त्याबद्दल एक ग्रामीण वास्तववादी लेखक म्हणून मी त्यांना मन:पूर्वक धन्यवाद देतो आणि कवी साहित्यिक हा त्याच्या आयुष्याबरोबरच एक लिहिणारा म्हणून गालिचासारखा उलगडत असतो... लिहिणार्‍याचे उलगडणे हे जन्मभर सुरुच असते ही जी लेखननिष्ठा सुरेश भटांनी सांगितली. (साहित्यिकांचे पाय सदैव जमिनीवरच असावेत पुणे येथील साहित्य कलायात्री आयोजित  5 व्या अखिल भारतीय नवोदित सा. संमेलनाचे अध्यक्षीय भाषण - लोकमत - साहित्य जत्रा - 8-11-1998) ती श्रीकृष्ण राऊत यांच्याबाबतही खरीचआहे. तूर्त त्यांच्या पुढील वाटचालीस मन:पूर्वक शुभेच्छा !
■■
बाबाराव मुसळे
143, एल. आय. सी. सेक्टर-2
जुनी आय. यु. डी. पी. कॉलनी,
वाशिम 444505
मो. 9325044210
.

लोकप्रिय पोस्ट

Netbhet.com
Blogvani.com

  © Blogger templates Newspaper III by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP