पेज

४.१०.०८

रोज ताजे नव्याने मरू लागले

रोज ताजे नव्याने मरू लागले;
लोक राजा असे का करू लागले?

भांडती चेहरे हे स्वतःशी अता;
कॉलरी आरशांच्या धरू लागले.

सापडेना घराची कशी वाटुली;
पाय चौकातले बावरू लागले.

लाज देशोधडीला कधी लागली?
नेसुचे सोडुनी पांघरू लागले.

कुंपणांनी दिला वावरांना दगा;
सांड मोकाट लाखो चरू लागले.

काय ताटात ह्या वाढले रे असे?
जेवणारे पहा घाबरू लागले.
-----------------------------------
('आदिम' दिवाळी 1982)
■ लेखन : १२  जुलै १९८२

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा