पेज

२०.५.०८

छतांच्या मर्त्य डोळ्यांना व्यथांच्या लागती धारा

छतांच्या मर्त्य डोळ्यांना व्यथांच्या लागती धारा;
म्हणे आकाश सोनेरी घरांना आणखी मारा.


कधी आसूड पाठीवर, कधी पोटावरी लाथा;
कधी या चंद्रमौळींच्या दिव्यांना झोंबतो वारा.


नको पाया पडू माझ्या, तुला मी पावलो देवा,
तुलाही रक्तमांसाचा हवा का सांग देव्हारा?


नव्याने पेटला वणवा, जळाले कोंब आशेचे;
पुन्हा रानात पोटाच्या भुकेला चावला चारा.


खुळे हे ज्ञान माझे अन् खुजे विज्ञानही माझे;
थिट्या चिमटीत प्रज्ञेच्या धरावा मी कसा पारा.

------------------------------------------------------
('दिशा' दिवाळी 1984)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा