पेज

६.५.०८

तू राहतेस हल्ली कोण्या भ्रमात पोरी

तू राहतेस हल्ली कोण्या भ्रमात पोरी;
वैरीण होत आहे काया तुझीच गोरी.

अंधार दाटल्याने तो साप वाटतो पण
अडवून मार्ग बसली ती फक्त एक दोरी.

जे काय पाहिले ते ठाऊक फक्त त्याला;
शेजेसमोर होता जो आरसा बिलोरी.

मी स्पष्ट बोलणारा, मी न्याय मागणारा;
डोळ्यात हीच त्यांच्या माझी सले मुजोरी.


पाहून रोज ज्याचा करतो कुबेर हेवा;
ऐसी जगानिराळी माझी दिवाळखोरी.

जठरामधील अग्नी जाळेल पोट जेव्हा;
होईल भरदुपारी तेंव्हा घरात चोरी.

अवघ्या जगास ज्यांनी होते दिले धडे पण
मी पाहिली तयांची पाटी अखेर कोरी.

पापे धुऊन अमुची झाली गढूळ गंगा;
आहे कशी कळेना तुमची पवित्र मोरी.

--------------------------------------------
('तरुण भारत' दिवाळी 1985)

२ टिप्पण्या:

a Sane man म्हणाले...

"पाहून रोज ज्याचा करतो कुबेर हेवा;
ऐसी जगानिराळी माझी दिवाळखोरी."

kya baat hai!

dr.shrikrishna raut म्हणाले...

आभारी आहे.

टिप्पणी पोस्ट करा